Friday, 12 June 2020

NEWS CORNER

 


दि. १५/०७/२०२०

कोरोना.. आणि महापुरुषांचे राष्ट्र कार्य

    कोरोना सारखे महामारीचे आजार या पूर्वीही जगामध्ये येऊन गेले ज्यावेळी तंत्रज्ञानाचा अभाव होता, मेडिकल सायन्स आजच्या सारखे अत्याधुनिक झालेले नव्हते. जनमाणसावर अंधश्रद्धाचा फार मोठा पगडा होता, हॉस्पिटल, डॉक्टर्स यांची संख्या खूपच अल्पप्रमाणात होती अश्या अभाव ग्रस्त वातावरणात कोरोना सारख्या जीव घेण्यासाथी मोठ्याप्रमाणावर येऊन गेल्या ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. याअगोदर प्लेग सारख्या साथीने जगभरात थैमान घातले असता, लोक मृत्युच्या भयाने सैरभैर झाले होते. अश्या भययुक्त वातावरणात महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले यांनी अश्या साथीच्या आजारात अविस्मरणीय असे कार्य केले व जे आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरावे असे आहेत.

                              कोरोना आणि महात्मा गांधी

       महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत वकिली करत असताना, ई. स. १८८७ मध्ये प्लेग सारख्या साथीने जोहान्सबर्ग शहरात थैमान घातले होते. अविकसित दक्षिण आफ्रिकेतील राज्यकर्ते प्लेगच्या साथीला अटकाव करण्यास असमर्थ असताना महात्मा गांधीनी लोकांना धीर देण्यास सुरवात केली. आपल्या मित्र-मंडळीच्या माध्यामातूननिधी जमा करून जोहान्सबर्ग शहरात रुग्णावर उपचार करणारी यंत्रणा उभी केली. वाड्यावस्त्यावर जाऊन लोकांना धीर देऊन योग्य उपचार करण्याचे मार्गदर्शन केले, या रूग्णामध्ये बहुसंख्य रुग्ण भारतीय मजदूर होते. अश्या गरीब मजदूरांचे हाल पाहून गांधी कळवले आणि दिवस रात्र या साथीच्या आजाराने भयग्रस्त झालेल्या लोकांना साथीच्या विरूधात लढण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता, एकांगी शिलेदाराप्रमाणे या साथीच्या आजारात महात्मा गांधीनी अविस्मरणीय असे कार्य केले. कोरोना सारख्या आजाराने आज भारतीय जनता भयग्रस्त झालेली असताना आमचे आजचे राज्यकर्ते जनतेला कसा धीर देत आहेत, हे सर्वज्ञात आहे. अश्यावेळी म्हणूनच महात्मा गांधीजीच्या या धीरोदत्त कार्याची आठवण येते.

**

कोरोना आणि राजर्षी शाहू महाराज

   राजर्षी शाहू महाराजानी ई.स. १८९७ मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये आपल्या जनतेसाठी केले कार्य आजही राज्यकर्त्यांना मार्गदर्शक व्हावे असे आहे. ई.स. १८९७ मध्ये प्लेगच्या साथीने कोल्हापूर संस्थान सह पुणे, मुंबई येथे मोठ्या प्रमाणावर थैमान घातले होते. ही साथ रोखण्यासाठी अपुरे साधने व तंत्रज्ञानाचा अभाव होता. अश्या अनिश्चितेच्या कालखंडात या साथीपासून आपल्या जनतेला लागण होवू नये म्हणून सुरक्षित ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. या साथीला अटकाव करण्यासाठी सर्वप्रथम सबनीस नावाच्या अधिकाऱ्याला प्लेग कमिशनर म्हणून नियुक्त केले, आणि प्लेग कमिशनरच्या नियंत्रणाखाली अंमलबजावणी यंत्रणा उभारली. तसेच जनजागृतीसाठी साथीच्या आजाराची माहिती देणारे लाखो पत्रकांचे वाटप केले, निरक्षर लोकांसाठी पत्रकाचे सार्वजनिक वाचन करण्याची सोय केली. वाड्यावस्त्या, गाव, तांडे ठिकाणा भेट देऊन शाहू महाराज लोकांना धीर देण्याचे जातीने लक्ष देऊन कार्य करत ज्यामुळे भयग्रस्त जनतेला आपल्या जीवाची रक्षा करणाऱ्या आपला वाली आहे. हे आत्मिक बळ मिळत असे. शाहू महाराज एवढ्यावर थांबले नाही तर देशातील पहिले होमेओपथिक रुग्णालय सुरु करून आपल्या संस्थानातील जनतेला जगामध्ये तत्कालीन काळी उपलब्ध असणारी अत्याधुनिक औषधी उपलब्ध करून दिली. शाहु महाराजांनी ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जे वेगवेगळे उपाय योजले त्यामध्ये संस्थानामध्ये येणाऱ्या-जाणऱ्या लोकांची चेक पोस्ट उभारून तपासणी सुरु केली, तसेच संस्थानातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा उभारून साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली गेली, तसेच जत्रा, यात्रा, महोत्सव, संमेलने अश्या गर्दीच्या ठिकाणावर बंदी घालणारे जाहीरनामे प्रसिद्ध केले. शाहू महाराजानी जनतेच्या काळजीपोटी अनेक जाहीरनामे काढले, असाच ज्योतिबा यात्रा संदर्भात काढलेला बंदीचा हुकुम महाराज जनतेची किती काळजी घेतो ते याचे या जाहीरनाम्यावरून लक्षात येईल. ज्योतिबाची यात्रा कोल्हापूर संस्थानातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध होती, ज्योतिबाच्या डोंगरावर भरणाऱ्या या यात्रेत महाराष्ट्रासह इतर राज्यातून ही भाविक येत असत. या यात्रेमुळे प्लेगची साथ पसरेल व मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होईल म्हणून महाराजांनी ही यात्रा रद्द करण्याचा हुकुम काढला. या हुकुमामध्ये महाराज म्हणतात,

सर्व लोकांस कळण्याकरिता ह्या जाहीरनाम्याने प्रसिद्ध करण्यात येते की, प्रस्तुत मुंबई, पुणे वगैरे बऱ्याच ठिकाणी ग्रंथिक संनिपात तापाचा अजार (ब्युबॉनिक प्लेग) सुरु असून काही ठिकाणी पटकीचे अजाराचीही सुरुवात झाली आहे व शिवाय दुष्काळचे कारणाने वैरणीची तुट सर्वत्र असून ती फार महाग मिळते व कोठें कोठें मुळीच मिळत नाही, या सर्व कारणांकरिता येत्या चैत्र शुद्ध १५ रोजी कोल्हापूरनजीक वाडी रत्नागिरी उर्फ जोतीबाचे डोंगरावर होणारी श्री केदारलिंगची यात्रा बंद करण्यांत आली असून तेथें कोणाही यात्रेकरूस  जाऊ दिले जाणार नाही”.

   अश्या साथीसमयी महाराजांनी हुकुमनामे काढून लोक भावनेपेक्षा संस्थानीतील जनतेचे जीव महत्वाचे या हेतूने कर्तव्य कठोर होऊन धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम बंद केले. वरील हुकूमनामा पाहिल्यास असे लक्षात येईल, शाहू महाराज जनतेच्या काळजीपोटी किती कठोर पणे वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून आपल्या संस्थानातील जनतेला साथीच्या रोगापासून वाचवण्यासाठी डोळ्यात तेल घालून काळजी घेत होते. शाहू महराजांच्या या साथीतील या कार्याचा अभ्यास करून आजच्या काळातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी राबविलेले धोरण उपयोगी ठरू शकते.

**

 कोरोना आणि सावित्रीबाई फुले

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन काळी प्लेग मुळे अनेक शहरात हाहाकार उडालेला असताना पुणे शहर त्यापासून दूरू राहू शकले नाही. ई. स. १८९७ मध्ये पुणे शहरात प्लेगने जेव्हा हातपाय पसरलेले, तेव्हा तत्कालीन अनेक सुधारक या साथीमध्ये जनतेला धीर देण्याचं काम करत होते. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपल्या जीवाची परवा न करता आपल्या डॉक्टर पुत्राच्या मदतीने डोंगरावर छोटे खाने प्लेग साठी हॉस्पिटल सुरु करते आणि प्लेग रुग्णांना वाचविण्यासाठी जीवाच्या आकांताने धावपळ करतात. प्लेग झालेल्या रुग्णांना पाठीवर टाकून हॉस्पिटल मध्ये नेतात. आपला पुत्र डॉ. यशवंतच्या मदतीने रुग्णांना वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. प्लेग च्या साथीतून हजारो रुग्णांना वाचवणाऱ्या सावित्रीबाई प्लेग मुळेच शेवटी बळी जातात. त्याचे हे बलिदान आजही राष्ट्राला प्रेरणादायी आहे. रुग्ण सेवेचा वसा घेतलेल्या आज हजारो नर्स भगिनी, डॉक्टर महिला मोठी किमंत चुकून रुग्ण सेवा करत आहेत. या सर्व सावित्रीच्या लेकी सावित्राबाई फुले यांनी दिलेल्या आरोग्य सेवेचा महान वारसा आज पुढे चालवत आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो.

**

 कोरोना आणि स्वामी विवेकानंद


     प्लेगचा कोलकत्ता परिसरात ई. स. १८९८ साली उद्रेक झाला होता. या साथीवर औषध नसल्यामुळे सगळीकडे भीती युक्त वातावरण तयार झाले होते.  प्लेगच्या साथीने रुग्णासोबत इतर सामान्य जनताही नैराश्यग्रस्त झाली होती. सगळीकडे साथीने कहर केला होता. घराघरामध्ये मृत्यूचे तांडव सुरु होते, अश्या बेसूर वातावरणात सामान्य जनतेला आधार देणार कोणी नव्हत अश्यावेळी ना देखवे डोळा म्हणून येतो कळवळा’ या तुकाराम महाराजाच्या वचनाप्रमाणे अश्या भयग्रस्त जनतेला धीर देण्यासाठी जीवाची पर्वा न करता स्वामी विवेकानंद बाहेर पडले आणि जनतेला मानसिक बळ देण्यासाठी खंबीर पणे जनतेच्या पाठीशी उभे राहिले. आपल्या देशात कोरोना साथीला चार महिने होत आहेत, या चार महिन्यात देशामध्ये असणाऱ्या लाखोच्या संख्येने संत, महत, जगतगुरू मात्र जनतेला धीर देण्याऐवजी मौन धारण करून बसले आहेत, आणि त्या काळी भगव्या कपड्यातील साधू, स्वामी साथ रोगाने बळी पडलेल्या लोकांच्या घरोघरी जाऊन दुखीतांचे अश्रू पुसण्याचे काम करतो, स्वामी विवेकानंदच हृद्य घेऊन झगमगाटात वावणाऱ्या साधू महाराजांनी कोरोनामुळे भयग्रस्त झालेल्या जनतेचे अश्रू पुसले असते, जनतेला खूप मोठा आधार मिळाला असता. वेळ गेलेली नाही आता तरी स्वामी विवेकानंदाचा आदर्श घेऊन आजच्या साधू महंतांनी भक्तांकडून जमा झालेली करोडोची सपंत्ती गरजू भुकेल्यांसाठी उपयोगी आणावी.

     कोरोनासारख्या महामारीच्या साथीमुळे आज जग स्तब्ध झाले असून, कोरोना साथीची भीती दाखवल्या गेली आहे. अश्या पद्धतीने भीती दाखवण्यात आली आहे. जणूकाही या अगोदर कधी साथीचे आजर आले नव्हते, कोरोना पेक्षा भयंकर साथी या अगोदर जगात येऊन गेल्या आज पर्यंत १८ साथींनी जगभरात अनेक ठिकाणी हाहाकार माजवलेला होता. पंरतु कोरोना साथीवेळी माध्यमाचा विस्फोट झाल्यामुळे कोरोना संकट आहे त्यापेक्षा हजारो पट गंभीर बनविल्या गेले. त्यातच त्या त्या देशाचे प्रमुख गोंधळलेल्या अवस्थेत दिसून लागले आणि यातून गोंधळलेले निर्णय घेतले जाऊ लागले. अश्यावेळी जुन्या काळात आमच्या महापुरुषांनी अश्या आजारापासून वाचविण्यासाठी लोकांना भयमुक्त करण्यासाठी जे कार्य केले ते आजही प्रेरणादायी आहे. आमच्या राजकारण्यानी या महापुरुषांचा अभ्यास करून जनतेला धीर देणारे धोरण ठरवावे. हिच अपेक्षा!    


संपादकीय टीम

शिक्षणविश्व 


                            दि. २६/०६/२०२०

दीन दुबळ्यांचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज

       आज कोरोना सारखे संकट सर्व देशावर आलेले असून, शैक्षणिक वर्ष चालू तर झाले

 आहे, पण ज्या शाळा दोन महिने बंद राहून माहे जून महिन्यात उघडतात, त्या ह्या वर्षी बंद

 असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा कधी उघडणार याची वाट पाहावी लागत आहे. आज सर्व

 शाळांमध्ये शाहू महाराजांची जयंती साजरी होते व त्यांनी शिक्षणाचे बीज कसे रोवले? याबद्दल 

सर्व विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यात येते. पण आज असे संकंट जरी उद्भवलेले असले तरी सर्व

 शाळांच्या शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण चालू केले आहे. एवढ्या संकंट काळात ही 

विद्यार्थ्याचे नुकसान होवू नये यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वांची धडपड चालू आहे. ज्यांची 

आज जयंती आहे, त्यांनी मांडलेले शिक्षणाबद्दल थोडक्यात विचार खालील प्रमाणे -   

       आपल्या शिक्षणातून आणि तसेच अभ्यासक्रमातून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रचारित व प्रसारित होत असतात. या थोर महापुरुषांचे सामजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपातील विचार आपल्याला प्रेरित व प्रोत्साहित करीत असतात. त्याचे विचार २१ व्या शतकात आपल्या विदयार्थी वर्गाला नव्याने देणे आवश्यक आहे.

       कारण शिक्षण हा जीवनाचा आधार आहे. शिक्षणापासून आपण आपणास वेगळे करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हा शिक्षण देणारा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. केवळ त्याच्याकडून आपण काय घ्यावे हे आपणास कळायला पाहिजे. शिक्षण ही जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. जीवन म्हणजे काय? जीवन का जगावे, जीवन कसे जगावे, जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे, जीवन पूर्ण कसे करावे. आपण जीवनातून काय घ्यावे व इतरांना काय दयावे. या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे शिक्षण होय. म्हणूनच

'शिक्षणानेच सर्व काही होत आहे, त्याकरिता आधी शिक्षण घेतलेच पाहिजे'

       जीवन शिक्षण ही काळाची गरज बनली आहे आणि आपल्या सर्व थोर शिक्षणतज्ज्ञांनी, विचारवंतांनी, समाजसुधारकांनी जीवन शिक्षणाची धुरा सांभाळली आहे आणि सर्वांना जगण्याची एक दशा आणि दिशा देण्याची महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. २१व्या शतकामध्ये शिक्षण घेणारा समुदाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण त्यातून जीवनविषयक शिक्षण मिळत आहे काय? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. तेव्हा आपल्या शिक्षणतज्ज्ञांचे आजच्याशिक्षणातून व अभ्यासक्रमातून प्रकट होणारे विचार निश्चितच येणा-या भविष्यकालीन समस्यांचे निराकरण व उत्तम जीवन जगण्यासाठी दिशादर्शक ठरतील. यामध्ये प्रामुख्याने महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मार्गदर्शनपर आहेत. शिक्षण आणि अभ्यासक्रमामध्ये जे विचार आहेत. ते याच थोरांचे आहेत. कारण आपली पिढी भरकटत चालली तेव्हा त्यांना या महामानवाचे आदर्श डोळ्यासमोर ठेवता येईल.

राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांचे शैक्षणिक कार्य-

१) विदयार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून दिले.

२) शिष्यवृत्तीची सवलत देण्यावर भर देण्यात आली.

३) विदयार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था केली.

४) विदयार्थ्यांना विविध सोयी सवलती दिल्या.

         जगामध्ये पहिल्यांदाच दीन-दुबळ्या जातींसाठी आरक्षणाची तरतूद करून समानतेच्या पातळीवर आणणाऱ्या आरक्षणाचा जनक आपली तिजोरी दीनदुबळ्यांसाठी खाली करणारा थोर राजा राजर्षी शाहू महाराज यांना शिक्षणविश्व तर्फे मानाचा मुजरा! 

 

संपादकीय टीम

शिक्षणविश्व 


दि. २१/०६/२०२०


ऑनलाईन शिक्षण; पालकांची परीक्षा


        कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता. शालेय मुलासाठी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. ऑनलाईन शिक्षण हा नियमित शिक्षणाला पर्याय होवू शकत नाही. परंतु सध्याच्या कोरोनाच्या साथीमुळे त्याला पर्याय ही राहिला नाही, म्हणून साथ आटोक्यात येई पर्यंत ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून राहावे लागणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांपुढे नवीनच समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारा मोबाईल किंवा TAB ची गरज अनिवार्य आहे. आधिच पालकांची आर्थिक कोंडी झालेली असताना, मुलांसाठी हा खर्च करावा लागत असून, ज्यांना खर्च करणे शक्य नाही अश्या पालकांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मोबाईल उपलब्ध जरी केला तर मुलांच्या आरोग्याचा प्रश्न भेडसावण्याची काळजी वाटते. एकूणच ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांची परीक्षा सुरु झाली असून, मुलांच्या भवितव्यासाठी पालकांना या परीक्षेत पास होवेच लागेल. यासाठी पालकांना हे नवीन तंत्रज्ञान शिकून, मुलांना त्या पद्धतीने शिकवावे लागेल. लहान मुलांना मोबाईल किंवा TAB देत असताना, ई लर्निंग मुळे स्क्रिनिग टाईम वाढल्याने डोळ्यावरील ताण वाढणार आहे, त्यामुळे पालकांनी विशेष काळजी घेवून मुलाच्या ऑनलाईन शिक्षणावर लक्ष द्यावे. मुल जर जास्त वेळ मोबाईल किंवा कॉम्पुटरचा वापर करत असतील, तर डोळे दुखणे, डोके दुखणे, डोळे कोरडे होणे, डोळ्याला खाज सुटणे, चिडचिडेपणा वाढणे, अंधुक दिसणे, कधी कधी एकच प्रतिमा दोन दिसणे असे त्रास उदभवू शकतात, म्हणून पालकांनी विशेष काळजी घेवून दर १५ मिनिटांनी ३० सेकंदाचा ब्रेक घेण्याची सवय मुलांना लावावी. तसेच मोबाईल अथवा कॉम्पुटरची स्क्रीन खूप चमकदार नसावी. मजकुराचा फॉन्ट मोठा असावा. स्र्किनवर मुलांच्या डोळ्यासाठी ‘एंन्टग्लास’ सौरक्षत्मक स्क्रीन कवर लावून घ्यावे. यामुळे ‘कॉम्पुटरव्हीजन सिंड्रोम’ हा डोळ्याचा आजार उदभवणार नाही आणि मुलाचे ऑनलाईन शिक्षण ही योग्य पद्धतीने होईल. शेवटी पालकांनी मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी ही परीक्षा पास होणे गरजेचे आहे.

संपादकीय टीम

शिक्षणविश्व


दि. ११/०६/२०२०


डॅडी चेंजड द वर्ल्ड

फ्लॉइडच्या सहा वर्षीय मुलीची पित्याला साद

 

 

    शेवटी जॉर्ज फ्लॉइड यांना लाखोच्या अश्रू नयनाने अखेरचा निरोप देण्यात आला. वर्णद्वेषाचा बळी ठरलेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या सहा वर्षीय मुलीने अंतिम यात्रेप्रसंगी डॅडी चेंजड द वर्ल्ड म्हणत आपल्या पित्याला साथ घालून जगाचे लक्ष वेधून घेतले. जॉर्ज फ्लॉइडचा २५ मे ला अमेरिकेतील मिनिया पोलीस येथील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूचा व्हिडीओ अमेरिकन समाज माध्यमात व्हायरल झाला आणि अमेरिकेसह जगाची पन्नास देशात काळ्या लोकांवर होणाऱ्या अन्याय विरूधात ब्लक लाइव्हज मॅटर जन आंदोलनाने पेट घेतला. वर्णद्वेषाच्या या घटनेनंतर अमेरिकेतील प्रमुख शहरासह स्वीजार्लंड, कॅनडा, मेस्को, बर्मुडा, जैनिका, स्पेन, अर्जेंटिना, ब्राझील, ऑस्टेलिया, बेल्जियम, चेक रिपब्लिकन, जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क, ग्रीस, हंगेरी, इटली, नेदरलँड्स, नार्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, रशिया, सर्बिया, स्वीडन, साउथ आफ्रिका, घाणा, केनिया, नायजेरिया, केबिया, चीन, जपान, फिलीप्यांस, थायलंड, साउथ कोरिया, श्रीलंका, टर्की, भारत (कोलकता), इराण सहजगातील पन्नास देशात या असंतोषाचा भडका उडाला होता. जगातील सर्व देशाच्या सर्व वर्णाच्या सर्व नागरिकांनी जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येचा निषेध करून ब्लक लाइव्हज मॅटर जनआंदोलनात पांठिबा दर्शविला. जॉर्ज फ्लॉइडला अखेरचा निरोप देताना, फ्लॉइडचा भाऊ रॉड म्हणाला, आता जगातील प्रत्येकाच्या स्मरणात जॉर्ज फ्लॉइड राहील. तो जगात बदल घडवणार आहे. खरोखरच जॉर्ज फ्लॉइडचे बलिदान जगामध्ये बदल घडविल. तो दिवस जगासाठी सुदैवी असेल. जगामध्ये बोकालेल्या जात, धर्म, वर्ण, वंश, स्त्री – पुरुष असमानता याचा जगातून अंत होईल. आणि जॉर्ज फ्लॉइडच्या  सहा वर्षीय मुलीनी घातलेली साद जगातील प्रत्येक नागरिकाच्या कानी जावो. हिच शिक्षणविश्वची जॉर्ज फ्लॉइडला श्रद्धांजली. 

 

संपादकीय टीम

शिक्षणविश्व

कोरोनामुळे शाळा समोर ‘अभूतपूर्व’ संकट



     आतापर्यंत या जगात इतके मोठे महामारीचे संकट आले नव्हते, त्यामुळे जगात सर्व गोष्टी सुरळीत चालत होत्या. सन २०२० साली कोविड १९ म्हणजे कोरोना नावाचा संसर्गजन्य रोग जसा सर्व देशात पसरला तसा सर्व देशाची शैक्षणिक, आर्थिक, कृषी व इतर उद्योगधंदे इत्यादी गोष्टीवर खूप मोठा परिणाम झाला. प्रत्येक शाळेसमोर आज खूप मोठ संकट उभे आहे, ते म्हणजे शाळा चालू करायचे पण कोरोनावर कशी मात करायची या व्दिधा मनस्थितीत आज प्रत्येक शाळा आहेत. कधी नव्हे ते जगातील शैक्षणिक क्षेत्रासमोर अभूतपूर्व असे संकट उभे राहिले आहे, यातून मार्ग काढण्यासाठी त्या त्या देशातील  सरकारे, शिक्षण तज्ञ प्रयत्न करत आहेत. परंतु ठोस उपाय योजना सापडत नाहीत. कोरोनाच्या प्रचंड अश्या दहशतीमुळे पालकांचा आत्मविश्वास खचलेला आहे. अश्यावेळी पालक व विद्यार्थ्यांचे तज्ञाकडून कौऊन्सिंग करणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या रचनेमध्ये बदल करून संपूर्ण शाळा परिसराचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेसाठी शाळेमध्ये आरोग्य कक्षाची निर्मिती अनिवार्य करण्यात यावी. विद्यार्थी संख्या मर्यादित करून जागतिक आरोग्य संघटनेच्या नियामवली प्रमाणे अंतराची रचना करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षकाचे आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण वर्ग घेण्यात यावे. जेणेकरून प्रशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांना सुरक्षा कवच देऊ शकतील. तसेच शिक्षकांची संख्या त्याप्रमाणात वाढ होणे आवश्यक आहे. वाहतूक व्यवस्थेतही त्याप्रमाणे बद्दल करून विद्यार्थी संख्या मर्यादित करून बसची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य करावे. वार्षिक अभ्यासक्रमाचे नियोजन कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देणे आवश्यक आहे, तसे नियोजन शाळेच्या सुरवातीस करणे आवश्यक आहे. सुट्या वगळून राहिलेले दिवस आणि वार्षिक अभ्यास यांचे तंतोतत नियोजन करून त्याची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी होईल, याकडे शाळाने लक्ष देणे आवश्यक आहे.

     विद्यार्थ्यांच्या प्रतिकारशक्ती वाढीसाठी आरोग्य तज्ञाच्या सल्ल्यानुसार योगा, प्राणायाम आणि आहार यावर दैनदिन लक्ष ठेवणारी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे.

कोरोनचा उगम स्थळ वूहान येथे असताना येथील शाळा सुरु झाल्या आहेत, या शाळांनी केलेल्या उपाय योजना लक्षात घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये –

१.      वूहान मधील शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थ्याचे नियमित तापमान चेक केले जाते.

२.      Hand wash साठी Sanitizer चा नियमित वापर

३.      मास्क वापरणे अनिवार्य  

४.      सामाजिक अंतराचे पालन  – एक  डेस्क एक  विद्यार्थी

५.      जेवणासाठी सिंगल कम्पारमेंट झोन तयार केले आहेत.

तसेच आपल्याकडील सर्व शाळांमध्ये आरोग्य विभागाच्या मार्गदर्शना खाली विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेसाठी अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध केल्यात पालकांची डळमळीत झालेली मानसिकता बदलून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी तयार होतील. यासाठी सरकार, संस्थाचालक, शिक्षणतज्ञ, डॉक्टर, पालक यांनी एकत्र येऊन या शाळेसमोरील अभूतपूर्व संकटातून मार्ग काढला जाऊ शकतो. 

 संपादकीय टीम

शिक्षणविश्व